आरमोरी (जि. गडचिरोली) – आरमोरी-गडचिरोली महामार्गावर 7 ऑगस्टच्या पहाटे सहा बालकांना भरधाव ट्रकने चिरडून चार जणांचा मृत्यू झालेल्या भीषण अपघातातील आरोपी ट्रक चालकाला गडचिरोली पोलिसांनी केवळ 48 तासांत गजाआड केले. या जलद कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात दिलासा व्यक्त केला जात आहे.
अपघाताची थरारक कहाणी
काटली गावातील काही बालके 7 ऑगस्टच्या पहाटे व्यायामासाठी रस्त्यावर होती. त्याच वेळी गडचिरोलीकडून आरमोरीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला.
उर्वरित दोन जखमी बालकांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलवण्यात आले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अज्ञात ट्रक व चालक फरार
अपघातानंतर ट्रक व चालक घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके स्थापन करण्यात आली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांचा पाठपुरावा
प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी ट्रक छत्तीसगड राज्यातून जप्त केला.
अटक झालेली आरोपींची नावे
या अपघातात सहभागी असलेले आरोपी ट्रक चालक प्रवीण बाळकृष्ण कोल्हे (वय 26, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया) आणि सहचालक सुनील श्रीराम मारगाये (वय 47, रा. चिचगड) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राजजी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

0 टिप्पण्या