नागपूर प्रतिनिधी
दुर्गाप्रसाद घरतकर
नागपूर: नमस्कार मंडळी कृत्रिम बुद्धिमत्ता, किंवा एआय, आजच्या काळात तंत्रज्ञानातील सर्वात चर्चित आणि प्रभावशाली संकल्पना बनली आहे. हे तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले गेले तर मानवाचे जीवन खूप सोपे आणि सुरळीत बनवू शकते. जगभरात विविध क्षेत्रांत एआयचा वापर झपाट्याने वाढतोय. गेल्या काही काळात एआयने अनेक क्षेत्रांत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने आता गुन्हेगारांना पकडण्यातही यश मिळत आहे. याचाच उत्तम उदाहरण म्हणजे नागपुरातील हिट अँड रन प्रकरण.
गेल्या आठवड्यात, रक्षाबंधनाच्या दिवशी, म्हणजे ९ ऑगस्टला, नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका भरदाव ट्रकने दुचाकीस्वार दांपत्याला धडक दिली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. मात्र, अपघातानंतर कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यामुळे मृत महिलेच्या पतीला आपली पत्नी दुचाकीवर बांधून घरी नेताना पाहावं लागलं, जे दृश्य सामाजिक माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालं.
अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ट्रकवर लाल रंगाच्या खुणा होत्या. मात्र, ट्रक किती मोठा होता किंवा कोणत्या कंपनीचा होता, याविषयी त्याच्याकडे विशेष माहिती नव्हती.
यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाच्या आजूबाजूला असलेली सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली. हे फुटेज वेगवेगळ्या टोलनाक्यांवरून मिळवण्यात आले. या सर्व सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या एआय प्लॅटफॉर्म MARVEL ची मदत घेण्यात आली.
MARVEL या राज्यस्तरीय एआय प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तीन टोल प्लाझावरील १२ तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून दोन वेगवेगळ्या एआय अल्गोरिथमच्या माध्यमातून तपास केला गेला. हे अल्गोरिथम कंप्युटर व्हिजन तंत्रावर आधारित होते. पहिल्या अल्गोरिथमनने लाल खुणा असलेले सर्व ट्रक ओळखून वेगळे केले. दुसऱ्या अल्गोरिथमनने या ट्रकच्या सरासरी वेगाचा अभ्यास करून कोणत्या ट्रकचा अपघातात हात असू शकतो, याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ट्रकची ओळख पटवली. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ग्वालियर-कानपूर महामार्गावरून संबंधित ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलं. हे ठिकाण अपघात स्थळापासून सुमारे ७०० किलोमीटर दूर होते. मात्र, एआयच्या मदतीने फक्त ३६ तासांत गुन्हेगार पकडण्यात आला.
MARVEL हे महाराष्ट्र सरकारचे राज्यस्तरीय एआय प्लॅटफॉर्म आहे, जे उपलब्ध माहितीचा वापर करून विश्लेषण करण्यास आणि मानवासारखे निर्णय घेण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानामुळे पोलिसांना पूर्वी आठवड्यांपर्यंत चालणारे तपास आता काही मिनिटांत पूर्ण करता येतात. नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण हे राज्यातील पहिले असे उदाहरण ठरले आहे जिथे एआयचा वापर करून गुन्हा उलगडण्यात आला.
या प्रकरणातून स्पष्ट होते की तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुन्हेगारी तपासात मोठे बदल घडवता येऊ शकतात. भविष्यात, एआय तंत्रज्ञान पोलीसांसाठी अधिक प्रभावी शस्त्र म्हणून काम करू शकते, जे गुन्हेगारांना लवकर पकडण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

0 टिप्पण्या