पालघरमध्ये एकाच महिलेची सहा मतदार ओळखपत्रं; मत चोरीच्या आरोपाला बळ.

Election palghar vote Chori 

मुंबई प्रतिनिधी
दुर्गाप्रसाद घरतकर

पालघर: देशभरात मतदार यादीतील गोंधळ, फेक मतदार आणि मत चोरीच्या आरोपांवर पुन्हा एकदा वादंग माजलं आहे. राहुल गांधींनी नुकतीच पत्रकार परिषद घेत, मत चोरी कशी होते याचे पुरावे सादर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील पालघरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका ३९ वर्षीय महिलेचं नाव एकाच मतदारसंघात सहा वेगवेगळ्या मतदार ओळखपत्रांमध्ये आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला सुष्मा गुप्ता असून, ती माता जीवदानी चाळ, नालासोपारा, पालघरची रहिवासी आहे. महिलेचं वय, पतीचं नाव (संजय गुप्ता) आणि पत्ता सर्व ठिकाणी सारखाच असूनही, तिचे EPIC नंबर – म्हणजेच मतदार ओळख क्रमांक – वेगवेगळे आहेत.

इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून उघड झाला प्रकार

फॅक्ट चेक करण्यासाठी संबंधित तपासणी थेट भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आली. Electoral Roll आणि Voter Search फिचरमधून "सुष्मा गुप्ता" हे नाव, पतीचं नाव आणि वय टाकताच अनेक नोंदी समोर आल्या.
सर्व नोंदींमध्ये महिला तीच – हिरव्या साडीतली, ३९ वर्षांची, पती संजय गुप्ता – असून, एकाच मतदारसंघात तिच्या नावावर सहा वेगवेगळे ओळखपत्र दिसून आले.

एक मत, पाच फेक मत?

सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर यामध्ये महिलेचं खरं मत एक, तर उर्वरित पाच फेक मतं असल्याचा संशय आहे. फक्त एका मतदारसंघात असा प्रकार उघड होत असेल, तर देशभरात फेक मतांची संख्या किती असू शकते, याची कल्पना करणेही कठीण आहे.

मत चोरीचा आरोप बळावतो


राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर समोर आलेले असे प्रकार मत चोरीच्या आरोपांना अधिक बळ देतात. एकाच घर क्रमांकावर ५०–१०० लोकांची नावे, एकाच नाव–वडिलांच्या नावासह डुप्लिकेट नोंदी, आणि एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ओळखपत्रं – हे सगळं निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत करतं.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

भारतीय निवडणूक आयोग हा देशातील निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्याची जबाबदारी सांभाळतो. मात्र, अशा गंभीर त्रुटी आणि गोंधळामुळे आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
जर आयोगाने या बाबतीत तातडीने कारवाई केली नाही, तर मतदारांचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जाते.

वाचकहो, तुम्हाला काय वाटतं – अशा फेक मतांच्या प्रकरणांवर निवडणूक आयोगाने कोणती पावलं उचलली पाहिजेत? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या