नांदेड | प्रतिनिधी
दुर्गाप्रसाद घरतकर
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हसनाळ गाव रविवारच्या मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः पाण्याखाली गेलं. गावातील सुमारे 250 ते 300 घरं पूर्णपणे जलमय झाली असून, नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले असून शेतमाल, पैसे, जनावरे, कागदपत्रं सर्व काही वाहून गेलं.
“पाच मिनिटांत उभा संसार पाण्यात गेला”
गावातील आशाभाई इंगोले यांनी डोळ्यात अश्रू आणत आपली व्यथा सांगितली.
“रविवारी रात्री अकरा वाजता जेवण करून आम्ही झोपलो होतो. रात्री अचानक लाईट्स चमकायला लागल्या. बाहेर पाहिलं तर संपूर्ण गावात पाणी आलं होतं. काही कळायच्या आत घराच्या छातीएवढं पाणी भरलं. आम्ही हातातलं सोडून जीव वाचवण्यासाठी धडपडलो. माझ्या 4–5 म्हशी वाहून गेल्या, बैलाची जोडी वाहून गेली. पैसा, भांडी, धान्य, कागदपत्रं सगळं संपलं. 30 वर्षांचा संसार फक्त पाच मिनिटांत संपला.”
जीव वाचवण्यासाठी साखळी करून गावाबाहेर
गावकऱ्यांनी सांगितलं की, रात्री 3 वाजेपर्यंत अंधारात एकमेकांच्या हाताला हात धरून साखळी तयार केली आणि जीव वाचवण्यासाठी उंचावरच्या जागेकडे पळ काढला.
लाईट नव्हती, पाण्याचा वेग जबरदस्त होता. आम्ही साखळी करून मुलं, वयोवृद्ध यांना बाहेर काढलं. काही जणं झाडांना धरून अडकली होती. देवाची कृपा म्हणून मोठी जीवितहानी टळली,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
जनावरं वाहून गेली, शेतमाल नष्ट
या पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली, अनेकांच्या म्हशी व बैलांचा बळी गेला. शेतमाल, धान्य आणि घरातील सामान पूर्णपणे नष्ट झालं आहे. अनेक कुटुंबं आता शेजारच्या गावात आसरा घेत आहेत.
गावकरी प्रशासनाकडे मदतीच्या अपेक्षेत
पूरग्रस्त ग्रामस्थांनी आरोप केला की “परगावचे लोक आम्हाला खिचडी, पाणी देऊन मदत करत आहेत. पण शासनाकडून कोणतीही तातडीची मदत मिळालेली नाही. आम्ही आजही उघड्यावर आहोत. आमच्या 300 घरांचा संसार पाण्यात गेला आहे. प्रशासनाने तातडीने मदत करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
हसनाळ गावाची स्थिती भीषण
सध्या गावात फक्त घरांची छप्परं दिसत आहेत आणि उर्वरित गाव पाण्याखाली आहे. सुमारे 250 ते 300 घरांतील कुटुंबं उघड्यावर काढली गेली आहेत.
ग्रामस्थांच्या मते, अशा प्रकारची परिस्थिती गेल्या 30 वर्षांत कधीच निर्माण झाली नव्हती.
शासनाकडून तातडीची मदतीची गरज
पूरामुळे हसनाळ गावातील शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा संसार, जनावरं, शेतमाल, पैसा – सर्व काही वाहून गेलं आहे. नागरिक प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी ग्रामस्थांची आर्त मागणी आहे.

0 टिप्पण्या