चंद्रपूरात मतदार यादीतील मोठा घोटाळा; घुग्गूसच्या एका घरात तब्बल 119 मतदारांची नोंद.



चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहरात मतदार यादीतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एका घर क्रमांक 350 मध्ये तब्बल 119 मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात या घरात केवळ दोनच लोक राहत असतानाही मतदार यादीत वेगवेगळ्या जात-धर्माच्या 119 लोकांची नावे या पत्त्यावर नोंदवण्यात आली आहेत.

काँग्रेसने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते व माजी खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच देशभरातील मतदार याद्यांमधील बोगस नोंदी आणि गोंधळाची माहिती देशासमोर मांडली होती. त्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर ग्रामीण व घुग्गूस शहरातील मतदार याद्यांची पडताळणी करण्यात आली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

राजू रेड्डी यांनी सांगितले की, “घुग्गूस शहरात शून्य क्रमांकांच्या घरांवर अनेक नागरिकांची नावे आहेत. मात्र, 350 क्रमांकाच्या घरात तब्बल 119 मतदार दाखवण्यात आले आहेत. यातील नागरिक वेगवेगळ्या जाती-धर्माचे असून, प्रत्यक्ष वास्तव्याचा काहीही पुरावा नाही.”

या घराचे मालक राजू बांदुरकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “माझ्या घरी एवढे लोक राहतात हे ऐकून मीच आश्चर्यचकित झालो आहे. प्रत्यक्षात माझ्या घरी फक्त दोनच लोक राहतात. मतदार यादीत एवढ्या लोकांची नावे कशी आली, याची मला काहीच माहिती नाही.”

या प्रकरणाने स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले असून, नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. याबाबत डिजिटल मिडिया पत्रकार दुर्गाप्रसाद घरतकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामागे मोठा गैरव्यवहार असू शकतो. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मतदार याद्या स्वच्छ व पारदर्शक असणे गरजेचे आहे.”

राजकीय व सामाजिक वर्तुळात या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या