गोंदिया | २८ जुलै २०२५
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले आहे. गोंदिया, सालेकसा आणि तिरोडा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून, १०२ घरे पूर्णतः अथवा अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. पावसामुळे घरांची भिंत कोसळणे, छप्पर उडून जाणे आणि घरातील सामान भिजण्याचे प्रमाण वाढले आहे.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गोंदिया तालुक्यात तब्बल १९२.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सर्व तालुक्यांमध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील एकूण सात महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
या मंडळांत अतिवृष्टी:
मंडळपावसाची नोंद (मिमीमध्ये)गोंदिया१९२.६ मिमीसालेकसा१८८.८ मिमीतिरोडा१६९.८ मिमीआमगाव१३७.० मिमीदेवरी१३५.६ मिमीअर्जुनी मो.१२७.४ मिमीसालेकसा१२१.७ मिमी
४५ रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प
गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी अनेक भागांत ४५ रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शाळा, बाजारपेठा आणि दवाखाने जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोंदिया, सालेकसा, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव येथे विशेषतः नागरिक अडकल्याचे समजते.
धरणांचे दरवाजे खुले
मुसळधार पावसामुळे ईटियाडोह आणि चिचगड या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ईटियाडोह धरणाचे ०.३० मीटरने दरवाजे उघडले असून, चिचगड धरणाचे ०.९३ मीटरने दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
प्रशासन सज्ज, पण धोका कायम
जिल्हा प्रशासनाने बचावकार्य आणि पुनर्वसनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एनडीआरएफ पथक तयार ठेवण्यात आले आहे. एक जखमी व्यक्तीचीही नोंद आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले असून, कुटुंबांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
आतापर्यंत सरासरी ५०८.७ मिमी पावसाची नोंद
गोंदिया जिल्ह्यातील सरासरी पावसाची नोंद ५०८.७ मिमी इतकी झाली आहे. यापैकी सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया तालुक्यात झाली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

0 टिप्पण्या