Digital Gaavkari
दुर्गाप्रसाद घरतकर
गोंदिया | 30 जुलै 2025 : गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. सलग दुसऱ्या दिवशी पुजारी टोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणाच्या आठ दरवाजांमधून 11.382 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे, ज्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून पाण्याचा वेग वाढला, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
पुजारी टोला धरणात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने विसर्ग आवश्यक झाला आहे. सोमवारीपासून सुरू झालेला विसर्ग आज मंगळवारीही सुरू असून, सर्व आठ दरवाजे उघडले गेले आहेत. नदीतून पाण्याचा जोर वाढल्याने नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये पूरजन्य स्थिती उद्भवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रशासन सतर्क, मदत पथके तैनात
गोंदिया जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क असून, नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये जमीनीवर नजर ठेवण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी मदत पथके आणि बोटींनाही सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
धरणाच्या विसर्गामुळे नदीतील पाण्याची पातळी जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः मच्छीमार, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने काळजी घ्यावी, असे सांगण्यात येत आहे.
0 टिप्पण्या