रस्त्यावर पाणीपुरी विकणारा तरुण आणि शहापूरच्या तरुणीची इस्रोपर्यंतची प्रेरणादायी झेप.


Digital Gaavkari
Durgaprasad Gharatkar.

गोंदिया : आणि ठाणे जिल्ह्यातील दोन तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाच्या कहाण्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत. एकीकडे रस्त्यावर पाणीपुरी विकणारा तरुण, तर दुसरीकडे शहापूरच्या छोट्याशा गावातील तरुणी यांनी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने स्वप्ने साकार केली आहेत.

रामदास मारबते: पाणीपुरीच्या ठेल्यापासून इस्रोपर्यंत
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गुमहादावाडा या छोट्याशा गावातील रामदास मारबते याने गरिबी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न जुमानता इस्रोमध्ये इंजिनियर म्हणून स्थान मिळवले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रामदास रस्त्यावर पाणीपुरीचा ठेला लावायचा. तरीही त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. दहावी, बारावी, आयटीआय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए पदवी मिळवत त्याने शिक्षणाचा पाठपुरावा केला. 2019 मध्ये इस्रोच्या प्रवासाला सुरुवात झाली. लग्नानंतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, दिवसातून एकदा जेवण, पाणीपुरीचा ठेला आणि रात्रभर अभ्यास यातून त्याने आपले ध्येय साध्य केले.

रामदासच्या वडिलांनी सांगितले, “माझा मुलगा लहानपणापासून हुशार होता. शिक्षक म्हणायचे, याच्याकडे लक्ष द्या. पण मी नोकरीत असल्याने त्याच्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकलो नाही. तरीही त्याने स्वतःहून अभ्यास केला, ट्यूशनशिवाय. ऑल इंडिया इस्रोच्या पंप ऑपरेटर (मेकॅनिकल) परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि 19 तारखेला इस्रोमध्ये रुजू झाला.” रामदासचा हा प्रवास गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

सुजाता मडके: शहापूरच्या गावातून इस्रोच्या शास्त्रज्ञपदापर्यंत

ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगाव येथील सुजाता रामचंद्र मडके हिने इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड होऊन आपल्या गावाचा आणि ठाणे जिल्ह्याचा गौरव वाढवला. शहापूरच्या गवी खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सुजाताने आयआयटी खरकपूर येथे शिक्षण मंत्रालयाच्या व्हर्चुअल लॅब प्रोजेक्ट टीममध्ये रिसर्च इंजिनियर म्हणून काम केले. यापूर्वी ती महाजनकोमध्ये सहाय्यक अभियंता आणि ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होती. एमपीएससी परीक्षेत यश मिळवत तिने आपली क्षमता सिद्ध केली होती.

सुजाताच्या वडिलांनी अभिमानाने सांगितले, “माझ्या मुलीची बेंगलोर येथे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. यंदा महाराष्ट्रातून फक्त दोन जणांची निवड झाली, त्यात माझी मुलगी आहे. मला तिचा खूप अभिमान आहे.” सुजाताच्या या यशाने ठाणे जिल्ह्याचा झेंडा इस्रोमध्ये फडकवला आहे.

प्रेरणादायी प्रवास

रामदास आणि सुजाता यांच्या कहाण्या छोट्या गावातून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत. कठीण परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि समर्पणाने यश मिळवता येते, हे या दोघांनी दाखवून दिले. त्यांच्या या गरुडझेपेमुळे अनेक तरुणांना स्वप्ने साकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या