सोलापूर : Maruti Chitampally passes away : भारतीय निसर्ग साहित्य आणि वन्यजीव अभ्यास क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व, आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सोलापुरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज शोककळा पसरली आहे.
वन्यजीव, मराठी भाषा आणि साहित्यात अद्वितीय योगदान
चितमपल्ली सर हे केवळ वन्यजीव अभ्यासक नव्हते, तर मराठी भाषेतील निसर्ग लेखनाचे अढळ स्थान लाभलेले लेखक होते. त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोश या महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या लेखनात निसर्गाशी नाते सांगणारी एक जिवंत शैली होती. निसर्गाविषयीचं जे विश्व त्यांनी मराठी वाचकांसमोर उभं केलं, ते अद्वितीय होतं आणि अद्भुत होते.
चितमपल्ली हे ३० एप्रिल २०२५ रोजी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित
केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्या वेळी ते सोलापुरात परतले होते आणि त्यानंतर त्यांचा आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर आज (१८ जून) सायंकाळी ७ वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला.
३६ वर्षांची वनसेवेत सेवा, परंतु चौकटीबाहेरचा अभ्यास त्यांनी केला.
मारुती चितमपल्ली यांनी सुमारे ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सरकारी सेवा बजावली. मात्र, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी भारतातील प्रत्येक प्रकारच्या जंगलांचा आणि प्राण्यांचा अभ्यास केला होता. त्यांनी निसर्गाशी संवाद साधणाऱ्या असंख्य लेखनकृती तयार केल्या आणि आपल्या ओजस्वी लेखनातून त्यानी जंगलाचे चित्र रेखाटले.
नवेगाव राष्ट्रीय उद्यानासह भारतातील अनेक जंगलांचा अभ्यास
चितमपल्ली सरांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ताडोबा, पेंच, मेलघाट, सतपुडा आदी जंगलांवर सखोल अभ्यास केला होता. त्यांनी वन्यजीवांच्या नैसर्गिक सवयी, त्यांचे जीवनचक्र आणि परिसंस्थेतील योगदान या सगळ्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मराठीतून वाचकांपर्यंत पोहोचवला.
मराठी भाषेला सुमारे १ लाख नवीन शब्दांची देणगी
साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाला तोड नाही. सुमारे एक लाखांहून अधिक नवीन मराठी शब्द त्यांनी शोधले, नोंदवले आणि वापरात आणले. मराठी निसर्ग वाङ्मय समृद्ध करणारा शब्दकोश म्हणजे त्यांच्या आयुष्याचं एक मोठं कार्य होतं.
मराठीसाठी अजून देणं द्यायचं होतं’ – शेवटच्या मुलाखतीत भावना व्यक्त
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत चितमपल्ली सर म्हणाले होते, "मराठीसाठी अजून काही देणं द्यायचं होतं, त्यासाठी मी अजूनही अभ्यास करत आहे." पण दुर्दैवाने, त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला आणि मराठी वाङ्मयाचं एक तेजस्वी पर्व संपुष्टात आलं.
निसर्गाची हिरवी वाट’ निर्माण करणारा लेखक
मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी त्यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, "चितमपल्ली सरांनी निसर्गाची हिरवी वाट’ निर्माण केली होती. त्यांच्या पुस्तकातून वाचक जंगलात भटकत होते, पक्ष्यांशी बोलत होते. ही शैली ललित होती, अभ्यासू होती आणि त्यातून निसर्गाशी जवळीक घडत होती."
एक युग संपलं... पण प्रेरणा अजरामर
मारुती चितमपल्ली यांनी भारतीय पर्यावरण, निसर्ग, मराठी भाषा, वन्यजीव आणि शाश्वत जीवनशैली यांचं अद्वितीय संगम साधणाऱ्या लेखनातून समाजाला जागृत केलं. त्यांच्या जाण्याने एक सर्जनशील आणि सजग युग संपलं, पण त्यांनी दिलेली प्रेरणा अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत राहणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
0 टिप्पण्या