डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
Saif Ali Khan Update: नमस्कार मंडळी,गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सेलिब्रिटींवर होणारे हल्ले आणि हत्या हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगने केलेला गोळीबार आणि त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे: बॉलिवूड अभिनेता आणि पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने सहा वार केल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरातील फॉर्च्युन हाइट्स या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सैफ अली खान राहतात. बुधवारी मध्यरात्री अडीच-तीनच्या सुमारास, सैफच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. तो सैफच्या धाकट्या मुलगा जहांगीरच्या खोलीत गेला होता. सर्वप्रथम, सैफच्या घरातील मोलकरीण एमिलिया फिलिप्स उर्फ लीमा हिने या व्यक्तीला पाहिले आणि आरडाओरडा केला. तेव्हा त्या व्यक्तीने हातातील धारदार चाकूने मोलकरणीवर वार केले. मोलकरणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ जागे झाले आणि त्यांनी जहांगीरच्या खोलीत धाव घेतली. मोलकरणीच्या हातातून रक्त येत असल्याचे पाहून, तसेच अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकू असल्याचे दिसल्यावर, सैफ त्याच्या दिशेने धावले. झटापटीदरम्यान, त्या व्यक्तीने सैफवर सहा वार केले, ज्यामुळे सैफच्या गळ्याजवळ आणि मणक्याजवळ जखमा झाल्या. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम मणक्याजवळ आहे, ज्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास केली. सध्या सैफला ऑपरेशन थिएटरच्या रिकव्हरी रूममध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या हल्ल्यानंतर, सैफ अली खानच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे: "सैफ अली खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस चौकशी करत आहेत. आम्ही लवकरच या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देऊ. त्यामुळे चाहत्यांनी कृपया संयम राखावा.
सैफच्या घरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत कारण फॉर्च्युन हाइट्स इमारतीला उच्चस्तरीय सुरक्षा आहे. इमारतीभोवती सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आहे. तरीही, हा अज्ञात व्यक्ती बाराव्या मजल्यावर कसा पोहोचला आणि सैफच्या घरात कसा शिरला, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. सध्या, मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेले आहे. त्यांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे या हल्लेखोराचा कोणाशी संपर्क होता का याची माहिती मिळू शकते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या सात टीम्स तयार केल्या आहेत ज्यापैकी एक टीम हल्लेखोराला शोधण्यासाठी मुंबईबाहेर पाठवण्यात आली आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना फोन करून मदतीची तयारी दर्शवली आहे. तसेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल अशीअपेक्षा आहे.
0 टिप्पण्या