संतोष देशमुख बीड: माजी सरपंचाचा अपहरण करून हत्या मस्साजोग मध्ये काय घडले?


Digital Gaavkari

Santosh Deshmukh News : नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोग गावात माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे गावातील आणि परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकेकाळी मस्साजोगमध्ये सरपंच पदावर कार्यरत असलेल्या संतोष देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली होती. त्यामुळे ते गावकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या सध्या मस्साजोगच्या सरपंच आहेत.9 डिसेंबरच्या दुपारी भर रस्त्यातून संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि त्यांचा मृतदेह बोरगाव-दहिटना रोडवर सापडला या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्याला व महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.

अपहरण कसे घडले?

9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता संतोष देशमुख आपल्या गाडीने जात असताना त्यांच्या गाडीसमोर MH-44-Z-933 क्रमांकाची एक काळी स्कॉर्पियो आली. गाडी चालवत असलेल्या त्यांच्या भावाला शिवराज देशमुख यांना वाट अडवण्यासाठी स्कॉर्पियो आडवी लावण्यात आली. स्कॉर्पियोमधून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांना गाडीतून जबरदस्तीने बाहेर काढून काठीने मारहाण केली आणि त्यांना ओढत स्कॉर्पियोत बसवले. गाडी भरधाव वेगाने निघून गेली.

घटनेनंतर गावकरी आणि पोलिस संतोष देशमुख यांचा शोध घेत होते. काही तासांनंतर त्यांचा मृतदेह बोरगाव-दहिटना रोडवर सापडला. मृतदेह पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. देशमुख यांच्या हत्येची बातमी पसरताच मस्साजोग आणि केजमध्ये तणाव निर्माण झाला.

संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येमागील कारण काय होते?

संतोष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामुळे संतोष देशमुख यांच्यावर सूड उगवण्याच्या हेतूने घुले यांनी त्यांच्या हत्येचा हा कट रचल्याचे समोर आले आहे .

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आरोपींची गाडी वाशी परिसरात सापडली. स्कॉर्पियो गाडीमध्ये रक्ताचे डाग होते, पण आरोपी मात्र पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी जयराम साठे आणि महेश केदार या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

गावकऱ्यांचा आक्रोश

संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर मस्साजोग गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संतापलेल्या जमावाने टायर आणि एसटी बस जाळली. ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या घटनेत खासदार बजरंग सोनावणे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही हस्तक्षेप करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या फक्त एका किरकोळ वादावरून झाल्याचे समोर आले आहे. माजी लोकप्रतिनिधीला भर रस्त्यातून अपहरण करून ठार मारल्याने बीड जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस तपास सुरू असून गावकरी न्यायाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या