डिजिटल गावकरी
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- लाखादुर तालुक्यातील शेतकर्याची व्यथा खरीप हंगामाच्या उत्पादित धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र, धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. दुसरीकडे यंत्रणा मात्र, घोंगडे पांघरूण झोपेचे ढोंग करीत असल्याचा प्रकारही पुढे आला. तालुक्यात आधारभूत हमीभावाने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी महामंडळ अशा दोन मुख्य एजन्सी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामातील धान खरेदी करताना खरेदी केंद्रासाठी एक नियमावली तयार केली आहे. यानुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळाला दिले आहे. मात्र, खरेदी केंद्रावर दिलेल्या निर्देशांचे कितपत पालन केले जात आहे? धान खरेदी करणारी यंत्रणा किती सजग आहे? याकडे यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याने उसनवारी करून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आता शासकीय अधारभूती धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतेवेळी दिवाळे निघाले आहेत. एका वर्षात साधारणतः अंदाजे सव्वा दोन लाख क्विंटल धानाचे उत्पादन एकट्या लाखांदूर तालुक्यात घेतले जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या धान खरेदी करणाऱ्या काही संस्था शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची वास्तूस्थिती आहे. परिणामी दिवसेंदिवस संस्था चालक मालामाल होत असून शेतकरी मात्र कंगाल होत असल्याचे वास्तव्य आहे.
◾अशी होतेय केंद्रावर लूट...
तालुक्यात काही धान खरेदी केंद्रांवर साध्या वजन काट्यावर धान मोजणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे असताना साध्या काट्यावर मोजणी का? हाच खरा संशोधनाचा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यातही सेटिंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. धानाचा कट्टा 40 किलोचा असतो. तो मोजणी करताना तोलारी 41 ते 42 किलो वजन घेतात. एका कट्याच्या मोबदल्यात दोन कट्टे मांडतात शिवाय कट्टा जमिनीला टेकेल एवढे झुकते माप घेतले जाते. 40 किलोच्या कट्टयावर एक किलो पासंग गृहीत धरले तर एका क्विंटलवर अडीच किलो अधिकचे माप धान खरेदी केंद्रांवर घेतले जात असल्याचे दिसून येते.
◾ओलाव्याच्या नावावर चार किलो धानाची कपात
लाखांदूर तालुक्यातील केंद्रावर ओलाव्याच्या नावावर 40 किलोमागे चक्क दोन ते अडीच किलो अधिक धान शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याची ओरड आहे. हा प्रकार अजिबात नवीन नाही, मात्र, शेतकरी मुकाट्याने सहन करतात, ही खरी शोकांतिका आहे. या प्रकारातून संस्था पाहिजे तेवढ्या मोठ्या झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही संस्थाचालक गब्बर झाले आहेत. दरवर्षी तालुक्यात होणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे.
◾अधिकारी, कर्मचारी नावापुरतेच...
धान खरेदी केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता पथके आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, खरेदी केंद्रावर सर्रापणे नियमांचे उल्लघंन केले जात असल्याने नावापुरते देखरेखीसाठी पणन विभागाचे कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार केला जात आहे.
0 टिप्पण्या